अनंतचतुर्दशीच्या दिवशी दादर चौपाटीवर विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेकडो मूर्ती भग्नावस्थेत इतरत्र पडून श्री गणेशाचा अवमान

मुंबई – अनंतचतुर्दशीच्या दिवशी दादर चौपाटीवर विसर्जित करण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेकडो मूर्ती आणि त्यांचे अवशेष भग्नावस्थेत इतरत्र पडले होते. भग्नावस्थेत पडलेल्या या मूर्तींपैकी काही मूर्ती मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी समुद्राच्या काठावर एका बाजूला ठेवल्या होत्या; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी आलेले अनेक भाविक त्या मूर्तींमधूनच चालत जात होते. या वेळी दिसणारे चित्र विदारक होते, तसेच त्यामुळे श्री गणेशाचा अवमान होत होता.

या ठिकाणी सकाळी समुद्राला भरती असतांना विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती दुपारनंतर समुद्राला ओहोटी आल्यामुळे विसर्जित केलेल्या ठिकाणी तशाच होत्या. या सर्व मूर्ती प्लास्टर ऑफ परिसच्या असल्याचे दिसून येत होते.

दादर चौपाटीवर मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली होती; मात्र बहुतांश भाविक मूर्तींचे विसर्जन समुद्रामध्ये करत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांचे प्रबोधन

दादर चौपाटी, तसेच अन्य विसर्जनस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातात फलक घेऊन, हस्तपत्रके वितरीत करून आणि उद्घोषणा यांद्वारे भाविकांना मूर्तींचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना मूर्ती वाहत्या जलाशयात विसर्जित करण्यामागील शास्त्र समजावून सांगितले. समितीच्या आवाहनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *