‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव विदेशात १२ ठिकाणी झाला साजरा !

मुंबई – ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या) वतीने विदेशात १२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात साधकांनी भावावस्था, तसेच चैतन्यदायी वातावरण अनुभवले. ऑस्ट्रेलिया; आशिया खंडातील मॉरिशस, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांत; युरोप खंडातील क्रोएशिया आणि इंग्लंड; उत्तर अमेरिकातील अमेरिका आणि कॅनडा, तसेच अन्य दोन देशांमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

जकार्ता, इंडोनेशिया येथे गुरुपूजनाच्या वेळी साधकांना संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले !
जकार्ता – येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. रेन्डी इकारांतियो यांच्या निवासस्थानी गुरुपूजन झाले. या वेळी अनेक साधकांना संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले. पूजा चालू असतांना अनेक साधकांची भावजागृती झाली, तर काहींना स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी अनेक साधकांना उत्साह जाणवत होता. त्यामुळे साधकांनी पूजेची भावपूर्ण सिद्धता केली.
मॉरिशस येथील साधकांकडून भावपूर्ण गुरुपूजन
वाकोवास – येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. संजय टिनू यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी ९ साधक उपस्थित होते. श्री. कृष्णन् आणि सौ. नादिया गोईंडेन यांनी गुरुपूजन केले. गुरुपूजन भावपूर्ण केल्यामुळे साधकांना गुरुपूजनाच्या स्थळी आनंद, चैतन्य जाणवले.
ओमाहा, अमेरिका येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपूजन
ओमाहा – येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक सौ. कविता आणि श्री. सोमनाथ परमशेट्टी यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्री. आणि सौ. परमशेट्टी यांनी गुरुपूजन केले. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *