‘मोफत कफन’ची काॅंग्रेस नगरसेवकाची मागणी.. मुंबई महापालिकेचा इनकार..

मुंबई: मुस्लिम कब्रस्तानमध्ये मृतदेहांसाठी कफन देण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवला आहे. काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी आर्थिकदृष्टय़ा गरीब लोकांना मोफत कफन द्यावे अशी मागणी केली होती, मात्र मृतदेह स्मशानभूमीत आणण्यापूर्वी लागणारे साहित्य प्रत्येक धर्माच्या प्रथेनुसार पुरवता येणार नाही असा अभिप्राय पालिका प्रशासनाने दिला आहे.

हिंदू स्मशानभूमीत ज्याप्रमाणे पालिका जळाऊ लाकूड मोफत देते त्याचप्रमाणे मुस्लिम दफनभूमीत मृतदेह पुरताना वापरले जाणारे बर्गा (लाकडी फळ्या) पालिकेमार्फत मोफत दिले जातात. तसेच दफनासाठीचे शुल्क माफ केले जाते. कफन मात्र नातेवाईकांना आणावे लागते. यापुढे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुस्लिम व्यक्तींसाठी पालिकेने कफनही मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी केली होती.
बर्गासाठीचे पैसे वाढवून देणार
आतापर्यंत या बर्गासाठी प्रतिमृतदेह ९०० रुपये खर्च पालिका देत होती, मात्र फळ्यांच्या किमती वाढल्यामुळे कंत्राटदार पुढे येत नव्हते. त्यामुळे पालिकेने दर वाढवून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार लहान मुलांच्या बर्गासाठी ८०० रुपये व प्रौढांच्या बर्गासाठी १६०० रुपये असा नवीन दर पालिकेने ठरवला आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला मृतदेह दफन करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्कही माफ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *