अंनिसकडून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नास्तिक बनवण्याचा घाट !

मुंबई – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे महापालिकेच्या इयत्ता ४ थी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यानुसार वॉर्ड आणि विभाग स्तरांवरील विद्यार्थ्यांना याविषयीचे मार्गदर्शन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

१. जुलै २०१५ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका वंदना साबळे यांनी ही मागणी केली होती. या मागणीमध्ये साबळे यांनी मुंबईसारख्या प्रगतीशील शहरात अंधश्रद्धेमुळे निर्माण होणार्‍या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावा करत मांजर आडवी जाणे, अंगावर पाल पडणे, अंगात येणे, जादूटोणा अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्रमाण जनसामान्यांमध्ये वाढत असल्याचे सांगितले होते. समाजातील या अंधश्रद्धांमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असून अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

२. यानुसार ६ सप्टेंबर २०१९ या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना अंनिसच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. याविषयी शिक्षणाधिकारी महेश पालकर म्हणाले, ‘‘या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळून विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल, तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत सकारात्मक पालट होईल.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *