ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान.. देव, देश आणि धर्म या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान..

बुलडाणा: चिखली अर्बन बँकेची ५७ वी आमसभा उत्साहात संपन्न झाली. ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान, रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या व २९ शाखांमधून कार्यरत व विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असलेल्या दि चिखली अर्बन को – ऑप बँक लि. ची ५७ वी वार्षिक साधारण सभा ( आमसभा ) रविवार, दि. ५ ऑगस्ट रोजी रानवारा रिसोर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडली. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत बँकेच्या कामकाजासंबंधी विविध ठराव पारित करण्यात आले. देव, देश आणि धर्म या तीन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना या वेळी बँकेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. याशिवाय रक्तदान शिबीर, सभासद व कर्मचार्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार आणि उत्कृष्ट शाखा पुरस्कारांचे देखील वितरण या प्रसंगी करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह प्रा अतुल मोघे, अकोला येथील आदर्श गो सेवा प्रकल्पाचे रतनलाल खंडेलवाल , जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

निरलस सामाजिक योगदानाचा सन्मान करण्याच्या भूमिकेतून चिखली अर्बन बॅंकेतर्फे दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाखाचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांच्या सारख्या ऋषितुल्य सेवा महर्षीला हा पुरस्कार दिल्याने चिखली अर्बन बँकेच्या सन्मानात भरच पडली असल्याचे गौरवोदगार बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी या प्रसंगी काढले. सत्काराला उत्तर देतांना ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांनी या सर्व कार्याची प्रेरणा द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजींची यांच्या समाधी वरील संत तुकोबारायांच्या अभंग पंक्तीतून मिळाली असल्याचे सांगितले . देव, देश आणि धर्म या साठी कार्य करीत असल्यास मरणानंतर ही आपणास लोकांमध्ये जिवंत राहता येते असे ते म्हणाले चिखली अर्बन बँकेने केलेली प्रगती व सर्वसामान्य लोकांच्या मिळवलेल्या विश्वासाचा आवर्जुन उल्लेख महाराजांनी केला व आर्थिक व्यवहारात सचोटी व पारदर्शकता जपत असल्याबद्दल चिखली अर्बन बँकेचे कौतुक केले. आपल्याला पुरस्काराच्या रूपाने मिळालेली एक लाख रुपयाची रक्कम संजय महाराज पाचपोर यांनी भारतीय गोशाळा संगोपन समिती, आळंदी यांना देणगी म्हणून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *