मराठा आंदोलनाला हिंसक वळण.. राज्यभर निदर्शने..

मुंबई – महाराष्ट्रभरातून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या. २३ जुलै या दिवशी संभाजीनगरमध्ये काकासाहेब शिंदे या आंदोलनकर्त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने २४ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. २४ जुलैला राज्यभर विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चासह मराठा संघटनांनी आंदोलने केली. ‘महाराष्ट्र बंद’मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या, तसेच आंदोलकांनी ‘बसगाड्यांवर दगडफेक करू नये’, अशा सूचनाही समन्वयकांनी दिल्या होत्या.

तरीही मराठा आंदोलकांनी राज्यात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करत धरणेही धरले. अनेक ठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन करून वाहतुकीची कोंडी करण्यात आली. महाराष्ट्रभरातून आक्रमक झालेले आंदोलक रस्त्यावर उतरले होते आणि काही शहरांसह जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या. काही ठिकाणी बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले. हिंगोलीजवळ खानापूर पाती येथे आंदोलकांनी पोलिसांची गाडी जाळली, तर कायगाव येथे आंदोलकांनी अग्नीशमनदलाच्या गाड्यांना आग लावली. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड यांच्या घटना घडल्या. मराठा संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आणि त्यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे ७ लाखांहून अधिक वारकरी खोळंबले असून त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
१. संभाजीनगर येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. येथील कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी आलेल्या श्याम पाठगावकर (वय ५० वर्षे) या पोलीस हवालदाराचा आंदोलनाच्या पळापळीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
२. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी दादर येथे बैठक झाली. मराठा संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २५ जुलैला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे बंदची हाक देण्यात आली आहे.
३. ‘या आंदोलनात काही ‘पेड’ (पैसे घेऊन आलेले) लोक घुसले असून हे आंदोलन अपकीर्त करून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे’, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगली येथे ते बोलत होते. 
४. २४ जुलैला पुन्हा बीड जिल्ह्यात एका व्यक्तीने विष प्राशन करून, तर एका तरुणाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
५. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते; मात्र तेथे जमलेले आंदोलनकर्ते संतप्त झाल्यामुळे खैरे यांना माघारी परतावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *