भगवद्गीतेवरून महाराष्ट्रात कुरुक्षेत्र.. जितेंद्र आव्हाडांची उडाली फे-फे !

नागपूर:भगवद्गीतोवरून महाराष्ट्राचे जणू कुरुक्षेत्रच झाले आहे. शाळा-महाविद्यालयांत भगवद्गीता वितरित करण्याबाबत शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या आदेशाचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले. या निर्णयावर टीका करताना यामागे ध्रुवीकरणाचे राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केला, मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळताना भक्तीवेदांत बुक ट्रस्ट, भिवंडी यांच्यामार्फत श्रीमद भगवद्गीता संचाचे वाटप करण्यात आले असून याच्याशी राज्य शासनाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात विशिष्ट धर्माच्या पुस्तकांना स्थान देणे गैर असल्याचे मत व्यक्त केले. हिंदुस्थानी राज्यघटनेनुसार सरकारची भूमिका धर्मनिरपेक्षच असली पाहिजे. धार्मिक पुस्तके उपलब्ध करून द्यायची असतील तर ती सर्वधर्मीयांची देणे आवश्यक आहे. सरकारने धार्मिक पुस्तकांऐवजी राज्यघटनेची पुस्तके द्यावीत अशी सूचनाही त्यांनी केली.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम नीट शिकवला जात नाही, विद्यापीठे नीट चालवली जात नाहीत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वेळेत मिळत नाहीत आणि त्यामध्ये सरकार विद्यार्थ्यांना भगवद्गीता वाचायला लावण्याचा प्रयत्न कशासाठी करते आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. हा प्रकार म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा एक प्रयत्न आहे अशी टीकाही त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांची उडाली फे-फे..
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी फुशारकी मारण्याच्या नादात स्वतःचे हसे करून घेतले. भगवद्गीता तोंडपाठ असल्याचे सांगणाऱया आव्हाडांना पत्रकारांनी गीतेतील श्लोक म्हणायला सांगितला तेव्हा त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पत्रकारांवर ते भडकले आणि खासगीत सांगतो म्हणाले.
..झाला गदारोळ
– कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ द्यायचा नाही. सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करायची या हेतूनेच सभागृहात दाखल झालेल्या शिवसेना आमदारांना विरोधकांनीही साथ दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नाणारचा मुद्दा उपस्थित करीत यावर स्थगन प्रस्तावाची मागणी केली.
स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत विधानसभाध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारल्याने शिवसेना आमदार आक्रमक झाले. त्यांनी वेलच्या दिशेने धाव घेतली. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनीही साथ दिली. शिवसेना आमदारांनी ‘नाणार जाणार’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *