५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान.. महाराष्ट्रात संतापाची लाट..

अमरावती: उत्तर प्रदेशातील ‘मधुबन प्रकाशन’तर्फे प्रकाशित केलेले आणि लेखिका डॉ. अनुराधा यांनी लिहिलेल्या ‘व्याकरण वाटिका ५’ या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. ‘शिवाजी हे शूर होते, पण बुद्धिमान नव्हते,’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला असून, प्रकाशन संस्था आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

व्याकरण वाटिका ५ या पुस्तकातील ‘रचनात्मक गतिविधीया’ या धड्यात परिच्छेद चार आणि पाचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला असून, लेखिका आणि प्रकाशकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. याबाबत सचिन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. हे पुस्तक बाजारात तसेच ऑनलाइन उपलब्ध आहे. शिवरायांबद्दल निखालस खोटा आणि अपमानजनक मजकूर प्रकाशित केला असून, शिवरायांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असं तक्रारीत नमूद केलं आहे. 

लेखिकेनं चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीतून लिखाण केलं आहे. शिवरायांची ओळख पराक्रमी, साहसी आणि बुद्धीवान राज्यकर्ता अशी आहे. पण लेखिकेनं जाणूनबुजून त्यांच्याविषयी अशा प्रकारचं लिखाण करून उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही तक्रारीत केला आहे. हे शिवरायांच्या बदनामीचे कारस्थान असू शकते, असं नमूद करत प्रकाशक आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच हे पुस्तक बाजारातून आणि इंटरनेटवरून हटवण्यात यावे. शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करू नये, तसेच या प्रकाशनावर बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *