जागृत हनुमान मंदिरात मांस टाकून विटंबना..शहरात तणावाचे वातावरण..

जिंतूर: शहरातील वरूड वेस चौकातील जागृत हनुमान मंदिराच्या आवारात अज्ञात व्यक्तीने मांस आणून टाकल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात विटंबना झाल्याची बातमी पसरल्यानंतर शहराची मुख्य बाजारपेठ बंद झाली. घटनेनंतर हिंदू समाजाच्या तरुणांनी मंदिर परिसर धुऊन स्वच्छ करुन मूर्तीची विधिवत पूजा केली. या बाबत नरेश मुदंडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वरूड वेस चौकात जागृत हनुमान मंदिर असून या मंदिरात नरेश सत्यनारायन मुंदडा हे सकाळच्या सुमारास दर्शनासाठी आले. मूर्तीचे दर्शन घेऊन ते मंदिराला प्रदक्षणा मारत असताना त्यांना मंदिराच्या आवारात मांसाचे तुकडे आढळून आले. त्यांनी याबाबत त्यांचे मित्र पवन बाहेती, द्वारकदास अपूर्वा, साईप्रसाद मंडगे, संजय श्रीवास्तव, नितीन सोनवणे, वैभव रायबागकर यांना माहिती दिली. तोपर्यंत पोलीस निरीक्षक एस.एस. आम्ले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू असून आज एकादशी आहे. या कृत्याचा जाहीर निषेध करून काही हिंदू समाज बांधवानी जिंतूर बाजारपेठ बंदची हाक देताच अवघ्या काही क्षणात बाजारपेठ बंद झाली. परंतु पोलिसांनी ही परिस्थिती सामंजस्याने हाताळल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. या बाबत जिंतूर पोलिस ठाण्यात मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार विजय भांबळे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, प्रताप देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. जमलेल्या नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शेकडो हिंदू तरुणांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून घटनेतील आरोपिंना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली.

अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *