*साहित्य संमेलनात साहित्यासोबतच कलावंत व कलाकृतींची मांदियाळी*

यवतमाळ(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी): ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात साहित्यासोबतच कलावंत व कलाकृतींचीही मांदियाळी मराठी सारस्वतांना अनुभवता आली आहे. वैदर्भीय कलावंतांसाठी त्यांच्या कलागुणांच्या अभिव्यक्तीसाठी हे संमेलन एक मोठे वरदान व व्यासपीठ ठरले आहे. याची प्रचिती यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी गावातील सचिन नार्लावार यांच्या नैसर्गिक लेणं या काष्ठशिल्पाच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर आली.

सचिन नार्लावार यांच्या छोटेखानी स्टॉलमध्ये जणू अवघं जंगल विश्व सामावलेलं आहे. जंगलात आढळणाऱ्या विविध आकारांच्या काष्ठांचे संगोपन संवर्धन करण्याचा हा छंद त्यांना ते नवव्या वर्गात असतानाच जडला. या छंदाची परिणती म्हणजे  त्यांचे हे प्रदर्शन व त्यांच्या घरात त्यासाठी असलेले स्वतंत्र दालन होय.

कला शिक्षक म्हणून येथील दत्तराम भारती कन्या शाळेत ते काम करतात. अरुणावती नदीच्या काठावर वसलेल्या आर्णी गावात सचिनचे बालपण गेले. नदीकिनाऱ्यावरच्या या गावाला समृद्ध वनसृष्टी लाभलेली आहे. त्यात आढळणारे विविध काष्ठाकार त्यांना मोहवीत असत. या काष्ठाकारांमध्ये त्यांना विविध आकार व संकल्पना दिसू लागल्या. या काष्ठाकारांना घरी आणून त्यावर योग्य ते संस्कार करून ठेवण्याचा वसा सचिन यांनी घेतला. आजमितीस त्यांच्याकडे असे ६० हून अधिक काष्ठाकार आहेत.

या काष्ठाकारांना फार कल्पक शीर्षक त्यांनी दिलेले आहे. कशाला ते एकदंत म्हणतात, कशाला वृषभ तर कुणाला त्यांनी प्रेषित असे संबोधले आहे. शीर्षक पाहल्यानंतर त्या काष्ठात त्याचा प्रत्यय पाहणाऱ्यां

ना येत जातो. या काष्ठशिल्पांची ते विक्री करीत नाहीत हे येथे विशेष उल्लेखनीय ठरावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *