विकास काय असतो हे आम्ही बीड जिल्हयाला दाखवले – ना. पंकजा मुंडे

बारामतीकरांची हुजरेगिरी करणारांना दारात उभे करू नका – राष्ट्रवादीवर घणाघात

केज/अंबाजोगाई(बीड):— केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हयात कधी नव्हे तो कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास काय असतो हे आम्ही बीड जिल्हयाला दाखवून दिले आहे. ‘याचि देही याचि डोळा’ असा सर्वांगिण विकास साधतांना माणसं जोडण्याचेही काम आम्ही केले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. पंधरा वर्षे सत्ता असताना ज्यांना एक वीटही उभा करता आली नाही ते लोक माझ्या कामांचे उद्घाटनं करत आहेत, जिल्हयाला बारामतीच्या दावणीला बांधणा-या अशा नेत्यांना निवडणूक काळात दारातही उभा करू नका असा घणाघात त्यांनी केला.

अंबाजोगाई येथे २ कोटी २१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तालुका लघू वैद्यकीय पशूचिकित्सालयाच्या इमारतीचे लोकार्पण तसेच केज तालुक्यातील बनसारोळा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील ८० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज धुमधडाक्यात झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, गयाताई कराड, नेताजी देशमुख, कमलाकर कोपले, अविनाश मोरे, उषाताई किर्दंत तर बनसारोळा येथे समाजकल्याण सभापती संतोष हंगे, जि.प. सदस्या योगिनी थोरात उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना ना पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्याचं पालकत्व करताना मी वर्षानुवर्षे टिकतील अशा मुलभुत सुविधा उपलब्ध करून देत आहे. विकासाचे आकडे दररोज वाढतच आहेत. कामांचे उद्‌घाटन करायला वेळ मिळत नाही मात्र ठरवलं तर रोज पाचशे कोटीच्या कामाचे उद्‌घाटन होतील एवढी विकास चळवळ उभा राहिली आहे. मला फक्त विकासाचं राजकारण कळतं. अंबाजोगाई रूग्णालयाची दुरावस्था बदलली. मी चार वर्षात दिडशे कोटीपेक्षा अधिक निधी दिला तर राष्ट्रीय महामार्ग आणि इतर कामे असे एकूण २२०० कोटीचा निधी अंबाजोगाईला दिला असुन केज मतदारसंघाला झुकते माप दिल्याचे त्या म्हणाल्या. केवळ सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आणि जिल्हयाचे चित्र आणखी सुंदर करण्यासाठी मला ताकद आणि आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.

या जिल्ह्याला हक्काचे आणि घरचे नेतृत्व मिळाले.त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची विशेष दखल मी घेते. माणसाच्या जीवनाशी निगडीत सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर आहे. मला राजकारण विकासाच्या प्रश्नावर नको आहे.माझी भुमिका समजुन घ्या.मला सामान्य जनतेसाठी काम कराययचं आहे आणि हे करताना तुम्ही आशिर्वाद आणि खंबीर साथ द्या. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असुन नुकताच जाहिर झालेला अर्थसंकल्प सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. हे शहर माझं आजोळ असुन त्या भावनेतुन कुठल्याही प्रश्नावर मी सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी आवर्जुन सांगितलं.

राष्ट्रवादीवर घणाघात
————————
ना. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. ज्यांना पंधरा वर्षे सत्ता असताना जिल्हयात विकासाची एक वीटही उभा करता आली नाही ते लोक माझ्या कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा लावत आहेत, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व चालले आहे. प. महाराष्ट्रातील नेत्याची हुजरेगिरी करून जिल्हयाला बारामतीच्या दावणीला बांधणा-यांना दारातही उभा करू नका असे त्या म्हणाल्या.

परळीहुन शहरात आगमन होताच ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते साठे चौकात यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौकापर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ, नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे उद्‌घाटन आणि तालुका लघु पशुचिकित्सालय इमारतीचं उद्‌घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास गणेश कराड, हिंदुलाल काकडे, नारायण केंद्रे, संजय गिराम, अविनाश मोरे, बिभीषण गित्ते, अॅड.सतिश केंद्रे, दिलीपराव काळे, विलास जगताप, सुरेश कराड, डॉ.अतुल देशपांडे, हनुमंत तौर, संजय गंभीरे, रमाकांत मुंडे, बालासाहेब शेप, मदन परदेशी, संतोष काळे, मोहन आबा आचार्य, महादु फड, महेश शेप, कार्यकारी अभियंता भंडे, याशिवाय पशुसंवर्धन खात्यातील सर्व अधिकारी व अन्य प्रमुखांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात सीएम चषक अंतर्गत पारितोषिक मिळवणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पालक शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम कुलकर्णी आणि डॉ.आघाव यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *