शिर्डी । पोलिसांनी पकडलेल्या तांदळाचा मालक कोण?तांदूळ घोटाळ्यात बडे मासे?

शिर्डी । कोपरगाव शहरात 7 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा कोपरे मार्गे बैलबाजार रोड येथून एका राहत्या घरातून अँपे रिक्षा क्रमांक mh 17 ए.जी 6445 यामध्ये तांदळाच्या गोण्या भरून चमडे बाजार जवळील एका पत्र्याच्या धान्य दुकानात उतरवीत असताना अज्ञात व्यक्तीच्या माहितीवरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ही ऍपे रिक्षा तांदळाच्या गोण्यासह पोलीस स्टेशनला आणली होती. मात्र, आज सहा दिवस उलटूनही या तांदळाचा धनी कोण आहे याचा उलगडा होऊ न शकल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या तांदळा मागे मोठे मासे असल्याची शहरात चर्चा असून शहरात तर्क वितर्काना उधाण आले आहे.

7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ऍपे रिक्षा mh 17 ए जी 6445 यातून महाराष्ट्र शासनाचा तांदूळ अवैधपणे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील खंदकनाला जवळील चमडे बाजार रोड येथे सापळा लावला असता त्यांना सदर अँपे रिक्षा व त्यामध्ये तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी रिक्षा चालक नाना अशोक पेटारे रा. कोपरगाव यास मुद्देमलासह ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की, हा तांदूळ सुनीता नन्नवरे कोपरगाव, यांच्या राहत्या घरातून घेऊन निलेश धारक रा.कोपरगाव यांच्या धान्य दुकानात खाली करण्यासाठी चाललो असल्याचे सांगितले.

सदर तांदूळ हा शासकीय योजनेतील आहे किंवा शालेय पोषण आहाराचा, की शासनातील स्वस्त धान्य दुकान योजनेतील आहे, याची चौकशी करण्यासाठी कोपरगाव पो. स्टेशनचे पो. नि. राकेश माणगावकर यांनी कोपरगाव तहसीलदार आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पत्रव्यवहार केला असून त्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी पो. स्टेशनला येऊन पाहणी करून सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करावी असे सांगितले. मात्र, अद्याप पर्यंत कोणीही संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पाहणी केली नसल्याने त्या तांदळाला वाली कोण हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट होत नसल्याने यामागील सत्य परिस्थिती काय आहे हे समोर येण्यास अडथळा निर्माण होत आहे.

या तांदळाचा वाली कोण ? सदरचा तांदूळ स्वस्त धान्य दुकानाचा की शालेय पोषण आहाराचा? ज्या घरातून सदरचा तांदूळ नेला जात होता त्यांनी माल जप्त झाला तरीही अद्याप पर्यंत याबाबत काही आक्षेप का घेतला नाही? जे माल खरेदी करत होते त्यांची चौकशी होणार का ? सदरची घटना भ्रष्टाचाराची आहे किंवा त्याला पाठराखण नेमके कोण करतंय ? घटना इतकी गंभीर असून देखील अद्याप कारवाई का होत नाही ? या सर्व बाबी अद्याप निरुत्तर आहेत.या तांदूळ घोट्याळ्यात बडे मासे अडकले असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *