माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे दुःखद निधन

हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांचे सोमवार (ता.४) रोजी सकाळी ९ वाजता आश्विनी हॉस्पिटल, नांदेड येथे दुःखद निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. माजी आमदार आष्टीकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील होत.आष्टीकर हे हदगाव पंचायत समितीचे १७ वर्ष सभापती होते, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व वसंत सहकारी साखर कारखाना म. पोफाळी चे चेअरमन होते.ते सतत १० वर्ष हदगाव मतदारसंघाचे आमदार होते. हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने हदगाव येथे हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची १९९० या वर्षात स्थापना करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवस्था करून दिली.हदगाव येथे श्री दत्त कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासह हिमायतनगर, हरडफ, तामसा आदी गावांमध्ये त्यांनी शाळा, महाविद्यालय उघडत ग्रामीण भागातील विद्यारथ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. राजकारणातील दुरदृष्टी नेते म्हणून ते गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत त्यांची ओळख होती.अतिशय मनमिळाऊ आणि स्वपक्षीयांसह विरोधी पक्षातील नेते,कार्यकर्ते यांच्याशी ते जिव्हाळ्याचे संबंध जोपासुन होते.वयाच्या नववदीतही ते कालपर्यंत ते आपल्या आष्टी (ता.हदगाव)या गावाकडील शेताकडे जात असत.आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच आरामदायी जीवन न जगता सतत कामात आणि समाजसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. एक अभ्यासू आणि जनसेवेचा वसा घेतलेले मराठवाड्याचे ढाण्या वाघ म्हणून सर्वदूर परिचित असलेले माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांच्या जाण्याने सर्वच राजकीय क्षेत्रातील दिगगजांना धक्का बसला आहे.त्यांच्या पार्थिवावर मंगळवार(ता.५) रोजी सकाळी ११ वाजता आष्टी(ता.हदगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खा. अशोकराव चव्हाण, आ.प्रताप पाटील चिखलीकर,आ.डी. पी.सावंत,आ.अमर राजूरकर,सौ. राजश्री हेमंत पाटील,माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,उपविभागीय अधिकारी महेश वडदकर,तहसीलदार किरण अंबेकर यांनी रूग्णालयात जाऊन माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.नांदेड व यवतमाळ जिल्ह्यासह संपुर्ण मराठवाड्यातील दिग्गज राजकारणी,समाजकारनी,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह कंत्राटदार दिलीप परघणे, अरुण उपलेंचवार आदी मंडळींनी रुग्णालयाकडे अंत्यदर्शन घेण्याकरिता एकच गर्दी केली असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *