‘दक्षिण’ मध्ये समरजित महाडिकांच्या पाठीशी

जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत असून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना ‘शाहू’ ग्रुपचे प्रमुख आणि कागल मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार समरजित घाटगे यांनी पाठिंबा जाहीर केला. घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

दक्षिण मतदारसंघात घाटगे गटाची चांगली ताकद असून हा गट कोणाला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष होते. सोमवारी गोकुळ शिरगाव येथे घाटगे गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात घाटगेंनी भूमिका जाहीर केली.

मेळाव्यात बोलताना समरजित घाटगे म्हणाले, ‘दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी नेहमीच सकारात्मक राजकारणाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेकजणांना महत्वाची पदे मिळवली. घाटगे गटाच्या पाठिंब्यावर अनेकजण विजयी झाले आहेत. पण यंदाची निवडणूक अत्यंत वेगळी असून विकासकामांना गती देणाऱ्या महाडिक यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणुकीला उभा आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी महाडिक यांना विजयी करण्यासाठी कामाला लागावे.’

घाटगे यांच्या भूमिकेचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी स्वागत करुन शाहू ग्रुपच्या पाठिंब्याने अमल महाडिक यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक भूपाल पाटील, मारुती नागवे, बाबूराव पाटील, भगवान काटे, एम.एस. पाटील, सुरेश मोरे, विलास बेडगे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *