माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन – पंकजा मुंडे

4 वर्षानंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसतं. मुंडे साहेबांची हत्या झाली. खरंतर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

    

बीड:- ‘मुंडे साहेबांना काय झालं हे माहीत असेल तर ज्यांनी केलं त्यांचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमधे आहे. मला कुठल्या तपाशी एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल’ असं आक्रमक वक्तव्य महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही सडकडून टीका केली आहे. ‘जयंत पाटलांना हे शोभतं का? 4 वर्षानंतर मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्ये तुम्हाला राजकारण दिसतं. मुंडे साहेबांची हत्या झाली. खरंतर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार’ असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

‘लुच्चा-साल्या लबाड लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यू एक मोठी संधी वाटते. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. या जयंत पाटीलाला शोभतं का?’ हे लोक म्हणे, पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली का नाही हा विषय तुमचा नाही. जर तुम्ही छातीठोकपणे राष्ट्रवादीचे नेते आणि जे कुणी बोलतात तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार’  असं पंकजा मुंडे म्हणल्या. त्या बीडमध्ये आयोजित मतदार संघातील विकास कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमात जाहीर भाषणात बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यू राजकारण करायला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा राजीनामा पाहिजे. अशी पंकजा मुंडेची भीती वाटते का तुम्हाला? मी एक आवाज दिला तर मुंबई-दिल्लीपर्यंत माझे लोक यायला तयार आहेत. पण माझ्या लोकांनी लाठ्या-काठ्या खाव्यात अशी यांची चाल आहे. पण असल्या भूलथापांना बळी पडू नका’ असं पंकजा मुंडे जाहीर भाषनांत म्हणल्या.

तसंच, ‘मी सीबीआय ऑफिसर नाही की हॅकर नाही. मी मुंडे साहेबांची लेक आहे. खालच्या पातळीवर घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालं नाही’ असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेतलं हे भाषण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यांच्या या भाषणाचे राजकीय क्षेत्रात काय पडसाद उमटतात त्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *