बोंडअळीने उत्पादकांचे १०० टक्के नुकसान..

वर्धा : मागील खरीप हंगामात बोंडअळीमुळे राज्यातील शेतकऱ्यासंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यात एनडीआरएफ यांच्याकडूनही मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने मागणी केली होती. यानुसार बुधवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चर्चा करून बोंडअळीचा आढावा घेतला. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले, असा अहवाल देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही नीती आयोगाचे कृषी संशोधन अधिकारी डॉ. बी. गणेशराम यांनी दिली.

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी १५३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्यावतीने एनडीआरएफ मधून मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करीत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्यात दोन केंद्रीय पथक पाठविले. हे पथक औरंगाबाद व नागपूर विभागातील जिल्ह्यांना १५ ते १८ मे दरम्यान भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत आहे. आज नागपूर विभागात दाखल झालेल्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोई येथे ब्राह्मणी, हिंगणी, घोराड, आमगाव सालई (कला) येथील शेतकरी, वर्धा तालुक्यातील पवनार, देवळी तालुक्यातील विजयगोपाल व शिरपूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून बोंडअळीची माहिती जाणून घेतली.
या पथकात डीसीडी नागपूरचे संचालक डॉ. आर.पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या कोईम्बतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ. ए.एच. प्रकाश, उपायुक्त (बियाणे) नवी दिल्लीचे एस. सेलवराज, खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओम प्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन आणि तपास अधिकारी डॉ. तरुणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ राईस रिसर्च हैद्राबादचे संचालक एस.आर. वोलेटी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपसंचालक कापसे, कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बी. गणेशराम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, उन्हाळ्याचे तीन महिने शेतात कोणतेही पीक घेऊ नका. बोंडअळीचे चक्र खंडित करण्यासाठी तीन महिने शेत खाली ठेवा. ज्या शेतात मागील वर्षी कापूस घेतला, त्या शेतात यावर्षी कापसाऐवजी दुसरे पीक घेण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी पहिली खबरदारी म्हणजे परवानाधारक कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करताना पक्के बील घ्यावे. कंपन्या बीटी ३ बियाणे अवैधपणे विकत असून ते बियाणे शेतकऱ्यांनी घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डोळ्यात तेल घालून पिकावर लक्ष द्यावे. झाडाची पाहणी करून पाती वा कापूस फुलावर असताना कीटक दिसत असल्यास कृषी अधिकाऱ्यांना कळवावे. आपल्याला फेरोमेन्ट ट्रॅप उपलब्ध करून देण्यात येतील.
तणनाशकामुळे कॅन्सरचा धोका
अनेक शेतकरी तण काढण्यासाठी तणनाशकाचा उपयोग करतात; पण त्यामधील ग्लायफोसेट या रसायनाच्या अति प्रमाणामुळे कॅन्सर होतो. याचा वापर जमिनीवर थेट होत असल्याने हे रसायन मातीतून थेट पाण्यात मिसळते आणि त्यातून उत्पादित होणाऱ्या अन्न धान्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करते. पंजाबमध्ये रसायनांचा सर्वाधिक वापर होतो. यामुळे त्या राज्यात कॅन्सर रुग्णांचे प्रमाण एवढे मोठे आहे की, तेथील रुग्णांना उपचार घेण्यासाठी जायला रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्या गाडीचे नावही कॅन्सर ट्रेन आहे. त्यामुळे अशी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पवनारच्या शेतकऱ्यांशी चर्चा
पवनार येथे ग्रा.पं. कार्यालयात नंदकिशोर तोटे, जगदीश वाघमारे, पंढरी ढगे, सीमा सावरे, श्रीकांत तोटे या शेतकºयांनी आपबीती सांगितली. डॉ. नंदकिशोर तोटे यांनी सप्टेंबर महिन्यातच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे एकच वेचा निघाला. निघालेला कापूस प्रभावित झाल्याने त्याला कमी दर मिळाला. फेरोमेन्ट ट्रॅप लावले होते; पण त्यामुळेही बोंडअळीवर नियंत्रण आले नाही. निंबोळी अर्कासोबतच वेगवेगळे कीटकनाशक फवारले; पण बोंडअळीवर परिणाम झाला नसल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व शेतकºयांनी बोंडअळीमुळे उत्पादन ६० -७० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *